औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात पहिल्या पसंतीच्या मताचा कोटा पूर्ण न झाल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु….!

औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीच्या पहिल्या पसंतीचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नसल्याने दुस-या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

त्यामुळे आता निकाल हाती येण्यासाठी रात्री १० वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या पसंतीच्या फेरीत २५ हजार ३८६ चा कोटा काढण्यात आला होता, मात्र एकही उमेदवाराला तेवढी मते मिळाली नसल्याने आता दुस-या पसंतीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे.
याचदरम्यान पहिल्या पसंतीच्या मतमोजणीवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांना एकूण २० हजार ७८ मते पडली आहे. तर भाजपचे उमेदवार किरण काळे यांना १३ हजार ४८९ मते पडली आहे. तर सूर्यकांत संग्राम यांना १३ हजार ५४३ मते पडली आहे. यावेळी एकूण २ हजार ४८५ मते बाद झाली आहे. त्यामुळे पहिल्या पसंतीच्या फेरीत २५ हजार ३८६ चा कोटा एकही उमेदवाराला मिळवता आला नसल्याने आता दुस-या पसंतीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे.

अंतिम निकाल रात्री उशीरा
पहिल्या पसंतीच्या मतांचा निकाल हाती आला आहे. पण कोटा पूर्ण होऊ शकला नसल्याने आता दुस-या क्रमाकांची मते मोजली जात आहे. त्यामुळे आता यात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. तर अंतिम निकाल हाती येण्यासाठी रात्री उशीर होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.