Cotton Candy : ‘बुढ्ढी के बाल’ खाताय? आधी ही बातमी वाचा, तामिळनाडूमध्ये घातली बंदी, भयंकर कारण आलं समोर, जाणून घ्या….


Cotton Candy : लहानांपासून ते वृद्धांपर्यंत आवडीचे असलेल्या कॉटन कँडी म्हणजे ‘बुढ्ढी के बाल’ वर तामिळनाडू सरकारने बंदी घातली आहे. कॉटन कँडीमध्ये कॅन्सरला कारणीभूत असलेले रोडामाइन-बी हे केमिकल सापडल्याने तामिळनाडूच्या अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

तामिळनाडूचे आरोग्यमंत्री एम. सुब्रमण्यम यांनी सांगितले, ‘बुड्ढी के बाल’च्या तपासणीत त्यात कर्करोगाला आमंत्रण देणारा रासायनिक घटक असल्याचे निष्पन्न झाल्याने राज्यात बंदी घालण्यात आली आहे. या आधी शेजारच्या पुद्दुचेरीनेही ‘बुड्ढी के बाल’वर बंदी घातली आहे.

आरोग्यमंत्री सुब्रमण्यम म्हणाले, ‘बुड्ढी के बाल’मध्ये रोडामाइन-बी हा रासायनिक घटक आढळून आला आहे. कापडाचे रंग तयार करण्यासाठी रोडामाइन-बी वापरले जाते. त्याचाच वापर ‘बुड्ढी के बाल’ला आकर्षक रंग देण्यासाठी सर्रास केला जात असल्याचे तपासणीत समोर आले आहे. Cotton Candy

दरम्यान, तामिळनाडूपूर्वी, त्याच्या शेजारचे केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीने कॉटन कँडीवर बंदी घातली आहे. कॉटन कँडीमध्ये रोडामाइन-बी आढळल्यानंतर पुडुचेरीने ९ फेब्रुवारी रोजी राज्यात त्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

तसेच लेफ्टनंट गव्हर्नर तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी राज्यातील कॉटन कँडी विकणाऱ्या दुकानदारांची चौकशी करून त्यांचा साठा जप्त करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

काय आहे रोडामाईन बी केमिकल?

रोडामाईन-बी हे पाण्यात विरघळणारे रासायनिक संयुग आहे जे रंगाचे काम करते. चमकदार गुलाबी रंगासाठी ओळखले जाणारे हे रसायन मानवांसाठी विषारी आहे. मानवी शरीरात हे रसायन गेल्यानंतर पेशी आणि ऊतींवर ऑक्सिडेटिव्ह ताण येऊ शकतो. सातत्याने त्याचं सेवन केल्यानंतर कर्करोग आणि ट्यूमरचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

रोडामाइन-बी आणि त्याचे धोके पुढील प्रमाणे..

आतड्यांचा कर्करोग होण्याचा धोका.

हा रासायनिक घटक औद्योगिक वापरात डाय म्हणून वापरतात. चामडे, कागद आणि कापडांना रंग देण्यासाठी वापर केला जातो.

रोडामाइन-बी हा खाद्यरंग म्हणून वापरण्यास बंदी आहे. ‘बुड्ढी के बाल’ खूप खाणाऱ्यांच्या पोटात हा घटक जाउन बसतो.

रोडामाइन-बी पोटात गेल्यास तो ६० दिवस पोटात राहतो. किडनी, लिव्हर आणि आतड्यांत तो जमा होतो. त्यामुळे किडनी, लिव्हरचे आजार उद्भवू शकतात.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!