वाद पेटणार! भाजपचा प्रवक्त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती ; विरोधक आक्रमक

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी महायुतीच्या मंत्र्याचीं वाभाडे काढणारी काही प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापल असतानाच आता भाजपाच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपावर सडकून टीका केली आहे.
भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2 फेब्रुवारी 2023 रोजी भाजपा प्रवक्त्यांची यादी जाहीर केली होती. त्यानुसार भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून न्यायपालिकेला आता राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही ना? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी असे म्हटले आहे की, सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वांत मोठा आघात आहे. याचा भारतीय न्याय व्यवस्थेच्या निःपक्षपणावर दूरगामी परिणाम होईल, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. तसेच केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच एका राजकीय व्यक्तीच्या नियुक्तीने पूर्ण न्यायदानाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.