ठाकरेंच्या’ मातोश्री ‘वर खलबत ; मुंबईसाठी ठाकरे बंधूकडून राष्ट्रवादीला केवळ’ इतक्या ‘जागांचा प्रस्ताव, तिढा सुटणार?

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी जोमाने तयारीला लागली असताना जागा वाटपाच्या तिढाचा पेच कायम आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या झालेल्या बैठकीत ठाकरे बंधूंनी राष्ट्रवादीला १६ जागांचा प्रस्ताव दिला आहे. २५ जागांच्या मागणीसाठी राष्ट्रवादी आग्रही असून हा तिढा सुटणार का आहे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. या बैठकीत मुंबईतील जागावाटपाच्या फॉर्मुल्यावर चर्चा झाली असून, सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे बंधूंकडून राष्ट्रवादीला केवळ १६ जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.मात्र या प्रस्तावावर राष्ट्रवादी समाधानी नसल्याने येत्या काळात यावर आणखी काही फेऱ्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने किमान २५ जागा मिळाव्यात, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या मागणीमागे राष्ट्रवादीने मागील निवडणुकीतील कामगिरीचा आधार घेतला आहे. २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक निवडून आले होते. या हक्काच्या जागांसह पक्षविस्तारासाठी अतिरिक्त जागांची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. मात्र आता ठाकरे बंधुकडून त्यांना 16 जणांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

ज्या प्रभागांमध्ये राष्ट्रवादीचा पारंपरिक जनाधार आहे आणि जिथे स्थानिक उमेदवार प्रबळ आहेत, अशा ठिकाणच्या जागा सोडण्याची विनंती राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. जर राष्ट्रवादीला अपेक्षित २५ जागा मिळाल्या नाहीत, तर महाविकास आघाडीच्या मुंबईतील एकजुटीवर याचा काय परिणाम होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
