पुण्यातील नामांतराचा वाद पेटणार ; भाजपच्या आमदाराने सभागृहात उपस्थित केला’ हा ‘मुद्दा

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून नामांतराचे वाद सुरू असतानाच आता आणखीन एक नामांतरावरून वाद पेटणार आहे.
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी पुण्यातील हडपसर भागात असणाऱ्या महंमदवाडीचे नाव महादेववाडी करावे अशी मागणी सभागृहात केली आहे.

सुरुवातीला पुणे स्टेशनच नामांतर थोरले बाजीराव पेशवा करावे अशी मागणी भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली होती. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहराचे नाव जिजाऊ नगर करावे यासाठीची मागणी जोर धरू लागली. हे दोन वाद सुरू असतानाच आता पुण्यातील महंमद वाडीचे नाव महादेव वाडी करावी अशी मागणी होऊ लागली आहे.गेली ३० वर्षे ग्रामस्थ महंमदवाडीचे नाव बदलण्याची मागणी करत आहेत. एकही मुस्लिम कुटुंब येथे नसल्याने १९९५ मध्ये गावाचे नाव महादेववाडी करण्यासाठी प्रस्ताव एकमताने मंजूर झाला. मात्र, १९९७ मध्ये हे गाव महापालिकेत समाविष्ट झाल्याने नामांतर रखडले.त्यानंतर महापालिकेच्या नाव समितीला नामांतरणासंदर्भात प्रस्तावही काही वर्षांपूर्वी देण्यात आला होता. नामकरणाचे अधिकार महापालिकेला नसल्याचे तत्कालीन महापालिका आयुक्तांनी सांगितले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावकऱ्यांनी या विषयासंदर्भात आंदोलनही केलं होतं. त्यानंतर आता थेट सभागृहातच योगेश टिळेकर यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केल्याने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान नामांतराच्या मुद्द्यावर भाजपाचे योगेश टिळेकर यांच्यासोबतच त्यांच्याच मित्र पक्षात असणाऱ्या शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी सुद्धा या संदर्भात शासनाला एक पत्र लिहिलं असून त्यातून महंमदवाडीचे नाव महादेव वाडी करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.
