मराठा आरक्षणाच्या ‘जीआर ‘वरुन वादंग ; छगन भुजबळांच्या विधानाने भुवया उंचावल्या म्हणाले, मला जीआर…..


पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केल्यानंतर सरकारकडून हैदराबाद गॅझेटबद्दलचा जीआर काढण्यात आला. मात्र याच जीआरच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारमध्ये दोन गटांमध्ये मतभेद झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही जीआर मला दाखवला नाही, असे विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेटियरनुसार जात प्रमाणपत्र देण्यास मंजुरी दिली. यामुळे मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आता याच मुद्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकींदरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. मराठा आरक्षणासंदर्भात मला जीआर दाखवला नाही. मी पक्षाच्या बैठकीसाठी जात आहे, असे छगन भुजबळांनी सांगितले. उद्या होणारी ओबीसी मंत्र्यांची बैठक महत्त्वाची आहे. या बैठकीनंतर निर्णय घेतला जाईल. आजच्या बैठकीपेक्षा उद्याची बैठक अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आम्ही मुख्यमंत्र्यांना 8 पानांचे पत्र दिले आहे. हे पत्र आमच्या वकिलांनी तयार केले आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ते काळजीपूर्वक वाचले आहे. या पत्रात आम्ही कुणबी-मराठा आरक्षणासंदर्भातील ऐतिहासिक माहिती दिली आहे. हा शासकीय निर्णय सरकारने दबावाखाली घेतला आहे. या संदर्भात हरकती मागवणे आवश्यक होते, पण सरकारने त्या मागवल्या नाहीत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आलो आहोत, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.राज्यात 350 पेक्षा अधिक जाती ओबीसी प्रवर्गात आहेत. त्यामुळे या समाजावर कोणताही अन्याय होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यायला हवी होती. कुणबी आणि मराठा हे दोन समाज वेगळे आहेत. असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!