पुण्यात चौथ्या मजल्यावरून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू, ठेकेदाराकडून सुरक्षेकडे दुर्लक्ष, साधने न पुरवल्याने ठेकेदारासह डेव्हलपरवर गुन्हा दाखल…

पुणे : नियोजित गृहप्रकल्पातील चौथ्या मजल्यावरुन पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना हडपसर येथील काळेपडळ येथे घडली आहे.
राजू सोपान अवचर (वय. ४३, रा. आर्दशनगर, ऊरुळी देवाची, हडपसर -सासवड रोड) असे मृत्यु पावलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याप्रकणी अवचार यांचा मुलगा कृष्णा अवचार (वय. २८) यांनी काळे पडळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी श्री हरी डेव्हलपर्सचे स्वप्नील विकास बनकर (वय ३०, रा. भोसलेनगर, हडपसर) आणि रघुनाथ बबन खोपकर (रा. फातिमानगर, वानवडी) आणि ठेकेदार संतोष बाबुराव राठोड (वय ३०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, हा प्रकार काळे पडळ येथील जे एस पी एम कॉलेजच्या पाठीमागे अहिल्यादेवी होळकर चौकाजवळील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत रविवारी १३ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता घडला आहे,
मिळलेल्या माहिती नुसार, स्वप्नील बनकर आणि रघुनाथ खोपकर यांच्या श्री हरी डेव्हलपर्स यांच्या इमारतीचे बांधकाम सुरु होते. रविवारी राजू अवचार इतर काही कामगारांबरोबर काम करत होते. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सेंटिंगचे काम सुरु होते. दुपारी जेवणासाठी ते थांबले होते. जेवण झाल्यानंतर जिन्याकडे जात असताना ते वरुन खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
दरम्यान, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. उंचावर बांधकाम सुरु असताना बांधकाम मजूर अवचर यांना हेल्मेट, पट्टा अशी सुरक्षाविषयक साधने न दिल्याने, तसेच पुरेशा सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे निष्पन्न झाल्याने याप्रकरणी डेव्हलपर व बांधकाम ठेकेदार अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव तपास करत आहेत.