पुण्यात काँग्रेसला खिंडार ; 40 वर्षे निष्ठावंत राहिलेल्या नेत्यासह मुलाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे:नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकानंतर राज्यात महानगरपालिका निवडणुकीचं वारे वाहू लागलं आहे. अशातच आता पुण्याच्या मध्यवर्ती भागात काँग्रेसची ताकद मानले जाणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मुख्तार शेख यांनी आपला मुलगा विकार शेख यांच्यासह काँग्रेसला ‘रामराम’ ठोकला आहे. या पिता-पुत्रांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

मुख्तार शेख हे गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ होते. या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी दोन वेळा नगरसेवक म्हणून शहराचे प्रतिनिधित्व केले आहे. पुणे काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांक समाजाचा मोठा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, पक्षाला सोडचिठ्ठी देताना त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर आरोप केले आहेत.राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पुण्यातील काँग्रेसच्या व्होट बँकवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत ४० वर्षे पक्षासाठी झटणारा नेता सोडून गेल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्ष सोडल्यानंतर त्यांनी अशी खंत व्यक्त केली कीं, “काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांक समाजाला आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य संधी दिली जात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अल्पसंख्यांकावर अन्याय होत आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

पुण्याच्या मध्यवर्ती भागात काँग्रेसची पाळंमुळं घट्ट करणाऱ्या शेख पिता-पुत्रांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग निवडला आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसची ताकद कमी झाली असून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची ताकद वाढली आहे.