फ्रान्सकडून काँग्रेस खासदार थरुर यांना सर्वोच्च नागरिक सन्मान…
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात काँग्रेसचे नेते, खासदार आणि लेखक शशि थरुर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरिक सन्मान ‘नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सन्मान मिळाल्यानंतर थरुर यांनी आनंद व्यक्त केला आहे.
फ्रान्सकडून थरुर यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. फ्रान्समधील हा सर्वोच्च सन्मान आहे. अनेक पुस्तकांचे लेखक आणि तिरुवनंतपुरमचे काँग्रेस खासदार थरुर यांना फ्रान्सचे सिनेट स्पीकर जेरार्ज लार्चर यांनी फ्रान्सच्या दुतावासात हा सन्मान देऊन गौरव केला आहे.
शशि थरुर यांना २०२२ मध्येच या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. फ्रान्सकडून यासंदर्भात एक निवेदन जारी करण्यात आले आहे. सर्वोच्च फ्रांसीसी नागरिक पुरस्कार भारत-फ्रान्स संबंधांना अधिक मजबूत, आंतरराष्ट्रीय शांततेसाठी असलेली प्रतिबद्धता आणि फ्रान्सचे मित्र म्हणून शशि थरुर यांनी केलेले प्रयत्न यासाठी हा सन्मान दिला गेला आहे.
शशि थरुर यावर म्हणालेत की, फ्रान्स, त्यांचे लोक, त्यांची भाषा-संस्कृती, त्यांचे साहित्य आणि सिनेमा यांचे कौतुक करणारा व्यक्ती म्हणून आपल्या देशाने दिलेला सर्वोच्च नागरिक सन्मान दिल्याबद्दल आभारी आहे.
पुरस्कार काय आहे?
या पुरस्काराची स्थापना नेपोलियन बोनापार्ट यांनी १८०२ मध्ये केली होती. फ्रान्सचा हा सर्वोच्च सन्मान असून देशासाठी असामान्य कार्य आणि सेवा देणा-यांना तो दिला जातो. कला, साहित्य, विज्ञान आणि सामाजिक सेवा इत्यादी क्षेत्रातील योगदानासाठी तो दिला जातो.
किती भारतीयांना मिळाला?
दुर्गा चरण रक्षित यांना पहिल्यांदा हा पुरस्कार मिळाला होता. रक्षित यांना १८९६ साली त्यांच्या मानवतावादी कार्यासाठी हा सन्मान देण्यात आला होता. स्वतंत्र भारतात श्रीधरण जे मेट्रोमेन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जातात त्यांना २००५ मध्ये हा सन्मान देण्यात आला. सेड्रिक प्रकाश, अंजली गोपालन या मानवाधिकार कार्यकर्त्यांना तसेच शाहरुख खानला २०१४ मध्ये, टाटा सन्सचे संस्थापक नटराजन चंद्रशेखर यांना २०२३ मध्ये हा पुरस्कार मिळाला. अभिनेते शिवाजी गणेशन, कमल हसन, सौमित्रा चॅटर्जी, नादिर गोदरेज, मनिष अरोरा आणि अझिम प्रेमजी यांना देखील फ्रान्सचा सन्मान मिळाला आहे.