Congress : महाविकास आघाडी विरोधात घेतलेली भूमिका आली अंगलट, काँग्रेसच्या बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी…

Congress : काँग्रेस पक्षाविरोधात उघडपणे भूमिका घेणारे माजी खासदार संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी दुपारीच संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता संजय निरुपम यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे.

संजय निरुपम यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने दिल्लीतून संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश काढले. यावर आता संजय निरुपम काय प्रतिक्रिया देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत संजय निरुपम यांना स्थान दिले होते. मात्र, संजय निरुपम मुंबईतील लोकसभेच्या एकूण सहा जागांपैकी चार जागा ठाकरे गटाला देण्यात आल्यामुळे सातत्याने नाराजी व्यक्त करत होते. मुंबईतील सगळ्या जागांवर ठाकरे गटाचा पराभव होईल, असे भाकीतही त्यांनी वर्तविले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईत उद्धव ठाकरे यांची ताकदच शिल्लक राहिलेली नाही. Congress

त्यामुळे मुंबईतील चार ते पाच जागा ठाकरे गटाला देणे, कशाप्रकारे काँग्रेसची घोडचूक आहे, असा प्रचार आणि वक्तव्यं संजय निरुपम सातत्याने करत होते. संजय निरुपम यांच्या या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण होताना दिसत होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाने संजय निरुपम यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.
दरम्यान, वायव्य मुंबई मतदारसंघ काँग्रेसला मिळण्याची शक्यता दुरावल्यामुळे निरुपम हे आज पक्षाचा राजीनामा देणार होते. त्यापूर्वीच काँग्रेसने कारवाई केली. कोणत्याच पक्षाने त्यांना उमेदवारीचे आश्वासन दिलेले नसल्याने ते कोठे जातात याची उत्सुकता आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका चॅनलवरच्या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. त्यामुळे संजय निरुपम भाजपात जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.