बँकेची कामं लवकर उरकून घ्या! ‘या’ दिवशी देशव्यापी संप, नेमक्या मागण्या काय? जाणून घ्या…

नवी दिल्ली : बँक कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांना आता निर्णायक वळण मिळालं असून, पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्यासाठी देशभरातील बँक कर्मचारी 27 जानेवारी रोजी एकदिवसीय संपावर जाणार आहेत.

केंद्र सरकारकडून गेल्या दोन वर्षांपासून केवळ आश्वासनांवरच समाधान दिलं जात असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात आला असून, सार्वजनिक तसेच खासगी बँकांमधील कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
एलआयसी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड आणि सेबीसारख्या संस्थांमध्ये आधीच पाच दिवसांचा आठवडा लागू असताना, बँक कर्मचाऱ्यांना मात्र त्यापासून वंचित ठेवलं जात असल्याचा दावा संघटनांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, 2010 मध्ये दोन शनिवार अर्धदिवस कामकाज रद्द करून उर्वरित दोन शनिवार पूर्ण सुट्टी देण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर 11व्या आणि 12व्या द्विपक्षीय करारांमध्ये उर्वरित दोन शनिवार सुट्टी देण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला होता. मात्र, हा प्रस्ताव असूनही गेल्या दोन वर्षांत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे.
संघटनांच्या मते, पाच दिवसांचा आठवडा लागू झाल्यास कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल आणि ग्राहक सेवाही अधिक प्रभावी होईल. मात्र, सरकारकडून सकारात्मक निर्णय न मिळाल्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही, असा दावा UFBU ने केला आहे.
दरम्यान, 27 जानेवारी रोजी देशव्यापी संपाच्या दिवशी मुंबईत सकाळी 11 वाजता आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने बँक कर्मचारी एकत्र येऊन जोरदार निदर्शने करणार आहेत. याशिवाय राज्यातील आणि देशातील प्रमुख शहरांमध्ये मोर्चे, मेळावे आणि आंदोलनं आयोजित केली जाणार आहेत.
