सांगली जिल्ह्यात पूर्ण शुकशुकाट ; संपूर्ण गावाची मतदानाकडे पाठ, एक ही मतदान नाही…

पुणे : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाचा उत्साह सगळीकडेच असताना आता सांगली जिल्ह्यातील एका गावात सकाळपासून शुकशुकाट आहे.तासगाव तालुक्यातील बलगवडे गावातील नागरिकांनी मात्र लोकशाहीच्या या उत्सवावर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला आहे. संपूर्ण गावात एकानेही मतदानाचा हक्क बजावलेला नाही.

बलगवडे येथील गायरान जमिनीवर राज्य सरकारच्या माध्यमातून एक सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, हा प्रकल्प उभारताना गावकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पोटच्या लेकरासारख्या जपलेल्या आणि लावलेल्या सुमारे साडेबारा हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. या वृक्षतोडीच्या निषेधार्थ संपूर्ण गावाने मतदानाकडे पाठ फिरवली आहे
बलगवडे गावाची एकूण मतदार संख्या सुमारे २३०० इतकी आहे. प्रशासनाकडून दोन मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, वृक्षतोड करणाऱ्या सोलर प्रकल्पाचा निषेध करण्यासाठी संपूर्ण गावाने बंद पाळून मतदानावर बहिष्कार टाकला.

सकाळी मतदान केंद्र सुरू होऊनही दुपारपर्यंत याठिकाणी एकही मतदार फिरकलेला नाही. मतदान केंद्रावर केवळ अधिकारी आणि पोलीस तैनात असून, गावाने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.