३१ डिसेंबरआधी करुन घ्या ५ महत्त्वाची कामे, अन्यथा भरावा लागेल मोठा दंड, जाणून घ्या..

पुणे : वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फक्त नवीन वर्षाची तयारी नाही, तर अनेक महत्त्वाच्या सरकारी कामांची अंतिम मुदतही याच महिन्यात असते. जर तुम्ही ही कामे वेळेवर पूर्ण केली नाहीत, तर तुम्हाला मोठा दंड, व्याज किंवा कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. करदात्यांसाठी डिसेंबर महिना अत्यंत महत्त्वाचा आहे.
बहुतांश वेळा लोक नवीन वर्षाच्या तयारीत गुंतून जातात, पण डिसेंबर हा करदात्यांसाठी आणि विविध योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो. कारण या महिन्यातील काही कामे वेळेत पूर्ण न केल्यास मोठा दंड, व्याज किंवा कायदेशीर कारवाईचा धोका निर्माण होऊ शकतो.
यापैकी अनेक प्रक्रिया अनिवार्य असल्याने 31 डिसेंबर ही निर्णायक तारीख ठरते. त्यामुळे वाहनधारक असो की करदाते किंवा सरकारी योजनांचे लाभार्थी प्रत्येकाने या अंतिम तारखा लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ही कामे वेळेत पूर्ण केली नाहीत तर पुढील वर्षाची सुरुवातच आर्थिक अडचणींनी होऊ शकते.

राज्यातील वाहनधारकांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. जर वाहनावर HSRP नसल्यास १० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच काही वाहनधारकांनी ऑनलाइन अर्ज केला असला तरी नंबर प्लेट न घेतल्यास त्यांनाही १ हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे हे काम शेवटच्या क्षणावर न ठेवता तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे.

करदात्यांसाठीसुद्धा ही महत्त्वाची डेडलाईन आहे. आर्थिक वर्ष 2024-25 चे ITR अद्याप भरले नसेल, तर ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. या मुदतीनंतर ITR फाइल केल्यास लेट फी, दंड आणि व्याज आकारले जाईल. त्यामुळे उशिरा रिटर्न भरणाऱ्यांसाठी ही शेवटची आणि निर्णायक संधी आहे.
ज्यांची वार्षिक करदेयता १० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा करदात्यांसाठी १५ डिसेंबरपर्यंत ॲडव्हान्स टॅक्सचा तिसरा हप्ता भरणे बंधनकारक आहे. ही रक्कम वेळेत न भरल्यास व्याजासह दंड आकारला जाऊ शकतो. तसेच Form 27C चे डिक्लेरेशन अपलोड करण्याचीही हीच अंतिम मुदत आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी E-KYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. जर KYC पूर्ण नसेल, कागदपत्रांमध्ये त्रुटी असतील किंवा आधार- मोबाईल लिंक नसेल, तर नाव यादीतून वगळले जाऊ शकते. त्यामुळे लाभ मिळवण्यासाठी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
तसेच PAN आणि आधार लिंक करणे आता अनिवार्य आहे. ही प्रक्रिया ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण न केल्यास PAN कार्ड अवैध ठरू शकते. त्याचा परिणाम बँक व्यवहार, गुंतवणूक, इन्कम टॅक्स रेकॉर्ड यांसह अनेक महत्त्वाच्या कामांवर होऊ शकतो. शिवाय १० हजार रुपयांपर्यंतचा दंडही आकारला जाऊ शकतो.
वर्षाअखेरीच्या या सर्व महत्त्वाच्या तारखा दुर्लक्षित केल्यास केवळ आर्थिक तोटाच नाही, तर पुढील वर्षभर अनेक प्रक्रियांमध्ये अडथळे येऊ शकतात. त्यामुळे ३१ डिसेंबरपूर्वी ही सर्व कामे तातडीने पूर्ण करणे महत्वाचं ठरेल.
