विनोदी कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी यांचे निधन, वारकरी संप्रदायावर शोककळा…

पुणे : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.मधुकर महाराज गिरी यांचे आज (ता.१६) सकाळी सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांचे वय ९५ वर्षे होते.गिरी महाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर मोठी शोककळा पसरली आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे गिरी महाराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ह.भ.प. मधुकर महाराज गिरी हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ कीर्तनकार, समाजप्रबोधनकार आणि वारकरी संप्रदायाचे प्रचारक होते.
त्यांनी आपल्या आगळ्या-वेगळ्या विनोदी शैलीतील कीर्तनांनी संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले.गिरी महाराजांचे कीर्तन हे केवळ धार्मिक प्रवचन नसून,त्यात विनोद,सामाजिक संदेश आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम होता.

गिरी महाराजांनी आपल्या कीर्तनांमधून समाजातील विविध विषयांवर प्रकाश टाकला.ज्यामुळे प्रेक्षकांना हसत-हसत विचार करण्याची प्रेरणा मिळाली.त्यांच्या कीर्तनांमध्ये विनोदी शैलीचा वापर करून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य केले.ज्यामुळे त्यांचे कीर्तन सर्व वयोगटांमध्ये लोकप्रिय झाले.
ह.भ.प.गिरी महाराजांनी कीर्तनांमधून समाजाला हसत-हसत विचार करण्याची प्रेरणा दिली.त्यांचे योगदान वारकरी संप्रदायात आणि मराठी सांस्कृतिक परंपरेत सदैव स्मरणात राहील.