घरात शिरून ११ वर्षांच्या भावासमोरच कॉलेज तरुणीवर अत्याचार, शिक्षकानेच केला घात..

मुंबई : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका शिक्षकाने शिक्षिकी पेशाला काळीमा फासला आहे. आरोपीनं विद्यार्थिनीच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी आरोपी पीडित विद्यार्थिनीवर अत्याचार करत होता, तेव्हा पीडितेचा ११ वर्षांचा भाऊ घरातच होता. आरोपीनं भावाच्या डोळ्यादेखत विद्यार्थिनीवर अत्याचार केला आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
सौरभ खेडकर असं गुन्हा दाखल झालेल्या २५ वर्षीय आरोपी शिक्षकाचं नाव आहे. तो नवी मुंबई महानगर पालिकेच्या एका शाळेत कंत्राटी शिक्षक म्हणून काम करत आहे. त्याने त्याच्याकडे इंटर्नशिप करणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ मार्च रोजी पीडित तरुणीचे आई वडील गावी गेले होते. यावेळी घरी केवळ ती आणि तिचा ११ वर्षांचा लहान भाऊ होता. या परिस्थितीचा फायदा घेऊन आरोपी तिच्या घरात शिरला. यानंतर त्याने पीडितेशी जबरदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा सगळा प्रकार ११ वर्षाच्या भावाच्या डोळ्यादेखत घडला आहे. याप्रकरणी आता पीडितेच्या भावाचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे.
दरम्यान, पीडित तरुणी ही सायकॉलॉजीची विद्यार्थिनी असून ती आरोपी शिक्षकाकडे इंटर्नशिप करत होती. याच ओळखीतून जवळीक साधत आरोपीनं हे कृत्य केलं आहे. एका शिक्षकानेच विद्यार्थिनीवर अशाप्रकारे अत्याचार केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास कोपरखैरणे पोलीस करत आहेत.