महाराष्ट्रात थंडी ओसरली ; बदलत्या हवामानाने नागरिक हैराण, हवामान विभागाचा इशारा काय?

पुणे : राज्यात मकर संक्रांतीनंतर थंडीचा जोर कमी झाला असून,किमान तापमानात वाढ होत आहे. सतत होणाऱ्या तापमानाच्या चढ-उताऱ्यामुळे स्वाइन फ्लू,चिकनगुनिया निमोनिया यासारख्या आजारांचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आज ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह अंशतः ढगाळ हवामान होत आहे. पहाटेच्या वेळी धुके आणि दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढून, काहीसा उकाडा जाणवत आहे.किमान तापमानात वाढ कायम राहणार असून थंडी कमी – अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


वातावरणात सतत होणाऱ्या बदलावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ऐन थंडीत उन्हाचा चटका आणि अवकाळी पडणारा पाऊस अशा वातावरणाने नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.या थंडीच्या काळात विषाणूजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
शिवाय थंडीचा काळ स्वाईन फ्लूसाठी पोषक ठरणारा असतो तापमान घटल्याने संसर्ग वाढण्याचा धोका तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
