महाराष्ट्रात थंडीचा कहर! डिसेंबर अखेर टेन्शन वाढलं, हवामान विभागाचा हायअलर्ट

पुणे :महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून थंडीचा कडाका वाढला आहे. डिसेंबर अखेर हवामानात मोठ्या बदलाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.उत्तर दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा अधिक जाणवणार आहे. विशेषतः पुणे आणि राज्याच्या अंतर्गत भागांत थंडीचा जोर कायम राहणार आहे.

पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात मात्र थंडीचा प्रभाव अधिक जाणवणार आहे. आज पुण्यात किमान तापमान सुमारे 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली राहणार असून सकाळच्या वेळी हुडहुडी भरणारी थंडी जाणवेल. पुण्याच्या ग्रामीण भागात गारठा आणखी तीव्र असण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर भागांतही किमान तापमान 13 ते 15 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. मुंबई–ठाणे परिसरात थंडी सौम्य असली तरी सकाळी गारवा जाणवेल. त्यामुळे आज मुंबईसोबत कोकण किनारपट्टी आणि इतर भागात चांगलीच हुडहुडी भरणार आहे.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात आज हवामान मुख्यतः कोरडे राहणार आहे. दिवसभर आकाश निरभ्र राहील, मात्र सकाळी आणि उशिरा रात्री थंड हवा जाणवू शकते. मुंबईत किमान तापमान सुमारे 18 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. दरम्यान नव्या वर्षात ही नागरिकांना थंडीचा कडाका सहन करावा लागणार आहे.
