पुणे जिल्ह्यातील सीएनजी विक्री १० ऑगस्टपासून बेमुदत बंद, कमिशन वादावर तोडगा नाहीच..

पुणे : कमिशन मधील वादाबाबत समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे जिल्ह्यातील सीएनजींचे ४२ पंप १० ऑगस्टपासून बेमुदत बंद राहणार असल्याची माहिती आहे. पेट्रोल डिलर असोसिएशन ऑफ पुणेने याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन दिले आहे.
जिल्ह्यातील सीएनजी पंपांना टोरेंट कंपनीकडून गॅस पुरविला जातो. या कंपनीकडे कमिशनच्या सुधारित दराची ४२ पंपचालकांची १६ महिन्यांची एकूण ९ कोटी २७ लाख रुपयांची टोरेंट गॅसकडे थकबाकी आहे.
तसेच त्यासाठी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन अन्यधान्य पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात दोन बैठका झाल्या. परंतु त्यात झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे पंपचालक सीएनजी विक्री १० ऑगस्टपासून बंद ठेवणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष ध्रुव रूपारेल यांनी सांगितले.
याबाबत टोरेंट गॅस कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत पेट्रोलियम मंत्रालयाकडून आलेल्या सूचनांनुसार कंपनीचे कामकाज सुरू आहे. त्याबद्दल संघटनेला आक्षेप असेल तर त्यांनी मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा,” असे सांगितले.
दरम्यान, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १० ऑगस्ट पासून सीएनजी विक्री बंद होणार असली तरी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये सीएनजी पुरवठा सुरळीत राहणार असून वाहन चालकांना तो उपलब्ध राहणार आहे.