हवेलीत महसूल सप्ताहात कातकरी समाजाला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जातीच्या दाखल्यांचे वाटप; हवेलीत महसूल सप्ताहात विविध उपक्रमांतून नागरीकांना लाभ…!

उरुळी कांचन : हवेली तालुक्यात महसूल सप्ताहाला उत्साहात सुरुवात झाली असून नुकतेच डोणजे (ता हवेली) येथे २४० जातीच्या दाखल्यांचे वितरण कातकरी समाजातील नागरिकांना करण्यात आले असून युवा संवाद या कार्यक्रमातून तालुक्यातील विविध शाळांमध्ये महसूल अधिका-यांनी विद्यार्थ्यांना दहावी व बारावी नतंर आवश्यक असलेल्या दाखल्याबाबत महत्वाचे मार्गदर्शन केले.एक हात मदतीचा, जनसंवाद व महसूल दिन या अनुषंगाने दुर्गम व डोंगरी भागात महसूलचे पथक पोहोचल्याने तेथील नागरिकांना सुखद अनुभव लाभला.

हवेलीचे प्रांताधिकारी संजय आसवले, तहसीलदार किरण सुरवसे यांनी सर्वसामान्य जनतेच्या व शेतकऱी खातेदारांच्या कामाचा निपटारा त्वरीत करण्यासाठी सर्व मंडलाधिकारी व तलाठ्यांना निर्देश दिलेले आहेत.
महसूल सप्ताहात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६० चे कलम १५५ अन्वये दुरुस्ती आदेशाचे वाटप, शिधापत्रिका वाटप करण्यात आले. यावेळी महसूल नायब तहसीलदार सचिन आखाडे,स्वाती नरुटे, संदीप पाटील, संजय जोशी, निलिमा थेऊरकर व कर्मचारी उपस्थित होते.

सिंहगडच्या पायथ्याशी असलेल्या दुरुकदरा येथे महसूल अधिका-यांच्या उपस्थितीत महसूल अदालत पार पडली.कल्याण, हिंगणगाव, बहुली व तरडे येथेही महसूल अदालतीत जनतेच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले गेले.
शिक्षणासाठी व शासकीय कामासाठी उत्पन्न दाखले,जातीचे दाखले,वय अधिवास दाखले,नौन क्रिमीलेअर प्रमाणपत्रे यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती पत्रके मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांना वाटप करुन त्याबाबत मंडल अधिकारी व तलाठ्यांनी माहिती दिली.