नागरिकांनो सतर्क राहा, हवामानात होणार ‘हा’ मोठा बदल, जाणून घ्या..

पुणे : भारतीय हवामान विभागाने हवामानातील मोठ्या बदलांचा थेट इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारीत थंडी कमी जाणवत असून काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे आरोग्यविषयक तक्रारी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणवत असली तरी दुपारी मात्र उकाडा जाणवत असल्याने नागरिक गोंधळात पडले आहेत.


पुणे शहरात पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील काही दिवसांत शहरातील किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे उन्हाचा चटका जाणवत होता. मात्र, सोमवारी तापमानात लक्षणीय घट झाली असून वातावरणात पुन्हा थंडावा जाणवू लागला आहे.
पुढील दोन दिवस हवामान फारसा बदलणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथे झाली असून तेथे 7.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.
गोंदिया येथे 9.8 अंश सेल्सिअस तापमान होते. निफाड, गोंदिया आणि धुळे परिसरात गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, एकूणच राज्यात थंडी कमी होण्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, देशातील विविध भागांतही हवामान सतत बदलत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी थंडी कमी होत असून काही भागांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने काही राज्यांसाठी रिमझिम ते मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
