चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकलं, बीडमध्ये ७ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू..

बीड : एका ७ महिन्यांच्या चिमुकलीच्या घशाथ चॉकलेट अडकले अन् तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. त्यानंतर, चिमुकलीच्या कुटुंबीयांना आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती.

त्यामध्ये, एक लहानग्या मुलाने एलईडी बल्ब गिळल्याने त्याला त्रास होत होता. अखेर, डॉक्टरांनी तो एलईडी बल्ब काढून मुलाचा जीव वाचवला होता. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांनी हादरुन सोडलेल्या बीड जिल्ह्यातील ही ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.

येथील एका ७ महिन्यांच्या मुलीच्या घशात चॉकलेट अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. मुलीच्या घशात चॉकलेट अडकल्यानंतर या चिमुकलीचा मृतदेह कुशीत घेऊन नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय गाठले. मात्र, उपचारापूर्वीच या घटनेत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बीड तालुक्यातील काटवटवाडी गावातील या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आरोही आनंद खोड असे मृत मुलीचे नाव असून ती अवघ्या सात महिन्यांची होती. घरातच खेळत असताना खाली पडलेले चॉकलेट तिने तोंडांत टाकून गिळण्याचा प्रयत्न केला.
मात्र, चॉकलेट तिच्या घशात अडकले आणि तिचा यात दुर्दैवी अंत झाला. कोवळ्या जीवासाठी चॉकलेट काळ बनून आलं अन् चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
