चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका, म्हणाल्या, तुमची रंग बदलण्याची कला पाहून…

मुंबई : दोन दिवसापूर्वी मुंबईतील मरीन लाईन्स येथील महिलांच्या वसतीगृहात एका तरुणीची हत्या झाली, तर आज मुंबईतील मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय प्रियकराने ३२ वर्षीय प्रेयसीची हत्या करून लहान लहान तुकडे केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने तिच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्याला खायला घातले.
आता या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला असतानाच आता भाजप महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी सुप्रिया ताईंना प्रतिउत्तर दिले आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विट केले की, ‘सुप्रिया ताई, तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्याला पण लाज वाटली असेल.किती सोयीस्करपणे तुमच्या संवेदना जाग्या होताहेत हो. तुमच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मंचरच्या मुलीसाठी तुमच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत…मुलीला मुस्लिम तरूणानं पळवून नेलं. ती अडीच वर्ष सापडली नाही. तेंव्हा तुमचंच लाडकं सरकार होतं.
श्रद्धा वालकर प्रकरणात तुम्ही वेळीच लक्ष दिलं असतं तर तिचेही 35 तुकडे झाले नसते. वसुलीत मग्न असलेल्या तुमच्या गृहमंत्र्यांना श्रद्धा वालकरच्या आई वडिलांची हाक ऐकू आली नाही, हे ही दुर्दैवच ! मीरा रोड प्रकरणात नक्कीच कारवाई होईल. दोषींची गय केली जाणार नाही, कारण इथे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस या सक्षम नेत्याकडे आहे. त्यासाठी तुम्हाला ‘मगरमच्छ के आंसू’ गाळण्याची गरज नाही, मोठ्या ताई. अशी खोचक टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.