Chinchwad : आजारपणाचे खोटे कारण देणे पडले महागात, पोलीस कर्मचारी निलंबित, नेमकं प्रकरण काय?
Chinchwad : लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोली येथे जाण्याचे आदेश असताना पोलीस अंमलदाराने जाणीवपूर्वक आजारी असल्याबाबत खोटे कारण दिले. बंदोबस्तासाठी गैरहजर राहणार्या आणि वरिष्ठांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणार्या संबंधित अंमलदाराला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी याबाबतचे बुधवारी (ता. १७) आदेश दिले आहेत. भूषण अनिल चिंचोलीकर नेमणूक, मुख्यालय, पिंपरी- चिंचवड), असे निलंबित केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयीन आदेशानुसार १२ ते १९ एप्रिल २०२४ या कालावधीत लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोली येथे जाण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ५० कर्मचाऱ्यांची नेमणूकीबाबत आदेश प्राप्त झाले होते.
त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या ५० कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आली होती. यामध्ये भूषण चिंचोलीकर यांचाही समावेश होता. दरम्यान, बंदोबस्तासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांची 10 एप्रिल रोजी निगडी येथे पोलीस मुख्यालयात हजेरी घेण्यात आली. त्यावेळी भूषण चिंचोलीकर गैरहजर होते. आजारी असल्याचे त्यांनी फोनवरुन मुख्यालयात कळवले.
चिंचोलीकर यांच्या आजारपणाबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय काळे यांच्याकडे चौकशी करण्यात आली. चिंचोलीकर हे जुलाब, उलटी, ताप, पोटदुखीचा त्रास होत असल्याने औषधोपचारासाठी आपल्याकडे वैद्यकीय तपासणीसाठी आले होते, असे डॉ. काळे यांनी सांगितले. त्यांना रुग्णालयात दाखल होऊन तपासण्या करण्यास सांगितले. परंतु, चिंचोलीकर यांनी कोणत्याही तपासण्या केल्या नाहीत. त्यांना होत असलेला त्रास हा गंभीर नसल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले. Chinchwad
अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तासाठी नेमणूक केली असताना आजारी असल्याबाबत खोटे कारण सांगून बंदोबस्त चुकविण्यासाठी चिंचोलीकर गैरहजर राहिले. वरिष्ठांच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन आदेशाची अवहेलना केली.
तसेच कर्तव्यात गंभीर स्वरुपाची कसुरी केली. त्यांचे हे वर्तन बेशिस्त, बेजबाबदार व निष्काळजीपणाचे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे, चिंचोलीकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले आहेत.