कुठेतरी डाळ शिजतेय!! राज्यात राजकीय हालचालींना वेग, मुख्यमंत्री रात्री अचानक मुंबईत..
मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणातील समीकरणं पूरती बदलली असून सध्या सत्ताधाऱ्यांमध्ये खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा दिसून येत आहे. नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेळावा घेतला होता.
त्यानंतर त्यांनी ठाण्यातील निवासस्थानी सुमारे तासभर आपले मंत्री आणि आमदारांशी चर्चा केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. दरम्यान, ही चर्चा अचानक मध्यरात्री झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार यांनी २ जुलै रोजी राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आतापर्यंतचे सर्वात बंड करून ८ सहकारी नेत्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. अगोदर शिंदे गट आणि भाजपमध्ये मंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिमंडळात संधी द्यावी लागणार असल्याने दोन्ही पक्षात धुसफूस सुरु झाली आहे.
तसेच या तिन्ही पक्षातील आमदार मंत्री होण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे वरिष्ठांना त्यांची समजूत काढावी लागत आहे. नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आपल्याच मागण्यांवर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा आणखीच वाढत चालला आहे.
दरम्यान, जर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत शिंदे गटात असणारी नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांनी शिंदे यांची भेट घेतली असावी अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
त्यामुळे आता फडणवीस यांना या दोन्ही पक्षातील नेत्यांची नाराजी दूर करण्यात यश येईल का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.