वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांची तंबी, म्हणाले…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्री आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेचं चर्चेत येत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. जनतेतही त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नाराजी आहे.या सर्व बाबी लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच मंत्र्यांना तंबी दिली आहे. यापुढे चुका खपवून घेतल्या जाणार नाहीत, असं फडणवीसांनी मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वेगवेगल्या खात्यांसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कृषी, ग्रामविकास विभाग, विधी व न्याय विभागाअंतर्गत वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या. दरम्यान, याच बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्वच मंत्र्यांना झापलं. गेल्या काही दिवसापासून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि भरत गोगावले हे आपल्या वक्तव्यामुळे चांगलेच वादात सापडले. त्यांची वादग्रस्त वक्तव्य ही सरकारसाठी अडचण ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीम्यासाठी दबाव वाढत आहे. त्यात हे मंत्री शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे आहेत.त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी चुका खपवून घेतल्या जाणार नाहीत अशा शब्दात या मंत्र्यांना आता कडक शब्दात दम दिला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 मिनिटे सर्वच मंत्र्यांना काही सूचना केल्या. वादग्रस्त विधाने, कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. असेच प्रकार होत राहिले तर सरकारची प्रचंड बदनामी होते. ही अखेरची संधी, काय कारवाई करायची ती करूच, असा इशाराच फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिला. तसेच सर्व मंत्र्यांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
