मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडवर ; ‘ यशवंत ‘साखर कारखान्याच्या 299 कोटींच्या जमीन व्यवहाराला ब्रेक, काय आहे प्रकरण?

पुणे:गेल्या काही दिवसांपासून बहुचर्चित थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन व्यवहारात अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या कारखान्याच्या जमीन खरेदी–विक्री व्यवहाराला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला कारखान्याची जमीन 299 कोटी रुपयांना खरेदी करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. मात्र, या व्यवहारासाठी महसूल विभागाची आवश्यक परवानगी घेतलेली नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत तत्काळ व्यवहार थांबवण्याचे आदेश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल विभागाने या संपूर्ण व्यवहाराची सखोल तपासणी करावी आणि अहवाल सादर करेपर्यंत जमीन खरेदी-विक्री प्रक्रियेला स्थगिती राहील. त्यामुळे यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित जमीन व्यवहाराला सध्या ब्रेक लागला आहे.

थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन व्यवहार हा केवळ 500 रुपयांच्या नोटरी करारावर करण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने कोणतीही अधिकृत नोंदणीकृत खरेदी–विक्री प्रक्रिया पूर्ण न करता कारखान्याला तब्बल 36 कोटी 50 लाख रुपये अदा केल्याची बाब समोर आली आहे.

याशिवाय, संबंधित जमीन प्रत्यक्षात यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या ताब्यात नसून, तिचा संपूर्ण मालकी हक्क महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे आहे. तसेच ही जमीन चिंचवड देवस्थानची असून ती वर्ग 3 प्रकारात मोडते. त्यामुळे ही जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यात आली आहे का, तसेच राज्य सहकारी बँकेने या व्यवहाराला परवानगी दिली आहे का, याची तपासणी आवश्यक आहे.
या सर्व बाबींच्या पडताळणीसाठी महसूल विभागाचा अभिप्राय महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.मात्र, महसूल विभागाची पूर्वपरवानगी न घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप केला आहे.
