मुख्यमंत्री फडणवीसांचा पवार काका-पुतण्याना दणका ; शरद पवार अध्यक्ष असणाऱ्या संस्थेच्या चौकशीचे आदेश, काय आहे कारण?

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पवार काका – पुतण्यांना मोठा धक्का दिला आहे. त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश दिले असून साखर कारखान्यांकडून मिळणाऱ्या निधीचा वापर योग्य होत आहे का, याची तपासणी करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून दोन्ही पवारांची कोंडी केली जात आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या साखर उद्योग नियोजन बैठकीत विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. दरवर्षी ऊस गाळप हंगामात राज्यातील साखर कारखान्यांकडून प्रति टन गाळपावर एक रुपया या प्रमाणात निधी कपात करून तो व्हीएसआयला देण्यात येतो. हा निधी साखर उद्योगातील संशोधन, तांत्रिक प्रगती आणि प्रशिक्षण यासाठी वापरला जाण्याचा उद्देश आहे. मात्र, या अनुदानाचा प्रत्यक्ष वापर मूळ हेतूनुसार होत आहे का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने शासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसारच शरद पवार अध्यक्ष असणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या आदेशामुळे आता राज्यातील ऊस उद्योगाशी संबंधित महत्त्वाची संस्था असलेल्या वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटद्वारे मिळालेल्या सरकारी निधीचा वापर योग्य पद्धतीने केला जात आहे का, याबाबत आता शासन स्तरावर आता पडताळणी सुरू होणार आहे. यासाठी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीने दिले आहेत.

दरम्यान या चौकशीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली असून,राजकीय द्वेषातून एका चांगल्या संस्थेची चौकशी करून संस्थेचं नाव बदनाम केलं जातं, हे भाजपाचं आधुनिक राजकारण आहे. यातून कदाचित भाजपचा राजकीय डाव साध्य होईल, पण राज्याचं मात्र नुकसान होतं आहे, त्याचं काय?’ असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
