मुख्यमंत्री फडणवीसांचा मच्छीमारांसाठी मोठा निर्णय ; सवलतीच्या दरात आता वीज उपलब्ध होणार….

पुणे : महायुती सरकार सत्तेत आल्यापासून सरकार विविध योजना राबवत आहे, लाडकी बहीण योजना, महिलांना अर्ध्या तिकिटामध्ये एसटी बसने प्रवासाची सुविधा, यासोबत शेतकऱ्यांसाठी देखील अनेक नव्या योजनांची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.
दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे, आता शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना देखील सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना देखील सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती, नितेश राणे यांच्या या मागणीनंतर अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.मस्त्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्यामुळे ही वीज सवलत लागू करण्यात आली आहे, मच्छिमार, मस्त्य संवर्धक, मस्त्य व्यवसायिक, तसेच मस्त्यकास्तकार यांना ही सवलत लागू असणार आहे. मस्त्य व्यवसाय प्रकल्पांनाही कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रकल्पाची एनएफडीबी अंतर्गत नोंदणी आवश्यक असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे, या सवलतीमुळे मच्छिमार बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान शेतकऱ्यांसाठी सरकारच्या विविध योजना आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिली जात आहे, यासोबत सौर कृषीपंपांवर देखील मोठं अनुदान सरकारच्या वतीनं देण्यात येत आहे.

