शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यातील १० हजार गावांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा…


पुणे : राज्याच्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. हवामानातील सतत होणारे बदल हे कृषी क्षेत्रासमोर मोठे आव्हान बनले असून त्याचा थेट परिणाम शेती उत्पादनावर होत आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

राज्य सरकार जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यातील १० हजार गावांमध्ये ‘क्लायमेट प्रूफ’ शेतीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठच्या ३९ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा अध्यक्षस्थानी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, हवामानातील बदलामुळे पारंपरिक पद्धतीची शेती अधिक जोखमीची बनत आहे. त्यामुळे कृषी संशोधन संस्थांनी बदलत्या वातावरणात टिकून राहणारी आणि स्थिर उत्पादन देणारी नवीन पीकवाणे विकसित करण्यावर भर द्यावा. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन व्यवस्था आणि हवामानानुसार शेती पद्धती याबाबत मार्गदर्शन देणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी बोलताना त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही भाष्य केले. कर्जमाफी ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी तात्पुरती उपाययोजना असली तरी ती कायमस्वरूपी समाधान देऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होतो; मात्र शेतकरी कायमस्वरूपी कर्जाच्या दुष्टचक्रातून मुक्त व्हावेत यासाठी शाश्वत शेती पद्धती विकसित करणे आवश्यक आहे. या संदर्भात कृषी संशोधक आणि कृषी विद्यापीठांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हवामान बदलाचा विचार करून नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि टिकाऊ शेती मॉडेल विकसित करण्याची जबाबदारी कृषी संशोधन संस्थांवर असल्याचेही त्यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!