मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले पंतप्रधानांचे आभार! रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरींग क्लस्टर प्रकल्पासाठी ६२ कोटी ३९ लाख रुपये वर्ग..
पुणे : पुणे परिसरात सध्या अनेक छोटेमोठे उद्योग उभे राहत आहेत. यासाठी केंद्र सरकार देखील मदत करत आहे. आता पुण्याजवळील रांजणगाव येथे राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ (EMC) प्रकल्पासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यातील ६२ कोटी ३९ लाख रुपये एमआयडीसीकडे वर्ग केले आहेत.
त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाचे आभार मानले आहेत. केंद्राने ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी रांजणगाव येथे २९७.११ एकर जागेवर ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ उभारणीस मान्यता दिली आहे.
या प्रकल्पासाठी ४९२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी २०८ कोटी रुपये केंद्राचा हिस्सा असून यातील पहिल्या टप्प्यातील ६२ कोटी ३९ लाख रुपये केंद्राने एमआयडीसीकडे वर्ग केले आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे.
रांजणगाव येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात IFB, LG आणि Gogoro EV Scooter यासारख्या कंपन्यांचा सहभाग असेल. या प्रकल्पामुळे हा परिसर ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’ म्हणून नावारूपास येईल. याचा फायदा अनेकांना होणार आहे.
दरम्यान, अधिक उद्योजक कंपन्या तेथे आकर्षित होऊन त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. हे EMC कार्यन्वित करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि एमआयडीसीने विशेष परिश्रम घेतले असून त्यांचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.