अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सगळंच सांगितलं..

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत मागणी करत आहेत. याबाबत शेतकरी नेते आक्रमक झाले आहेत. आता पावसाळी अधिवेशन २०२५ दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते ते नक्कीच पूर्ण करणार. गेल्या काही दिवसांपासून सुरु आलेल्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर फडणवीसांचं हे वक्तव्य शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. कर्जमाफी हा तात्पुरता उपाय आहे, त्यापेक्षा शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन समृद्धीसाठी उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.
तसेच ते म्हणाले, कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, परंतु आर्थिक शिस्त व शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. कोणतेच राज्य दर पाच वर्षांनी कर्जमाफी देऊ शकत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांसाठी कधीही हात आखडता घेतलेला नाही. या घोषणेनंतर शेतकरी संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.

असे असताना मात्र, कर्जमाफीच्या निर्णयाची लवकर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी देखील केली आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुखाचे व्हावे त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील. त्याच्यासाठी राज्य सरकारने नवीन समिती स्थापन केली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, विरोधी पक्षांनी विधान सभेत सरकारवर टीका करत कर्जमाफीच्या निर्णयाबाबत उशीर होण्यावर प्रश्न उपस्थित केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट असताना सरकार बेफिकिर असल्याचा आरोप केला. यामुळे याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.