उरुळी कांचन येथील एलाईट चौकात केमिकलने भरलेला टँकर पलटी, रोडवर मोठी वाहतूक कोंडी…
उरुळी कांचन : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील एलाईट चौकात भरलेला केमिकलचा टँकर पलटी झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी टँकर व दोन दुकाने यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी (ता. १८) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा टँकर हा सोलापूर च्या दिशेने निघाला होता. यावेळी वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले व टँकर दुभाजक तोडून सेवा रस्त्यावर आला व पलटी झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती आहे.
तसेच चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने टँकर चालवून टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांच्या पत्र्याचे शेड पाडून आत घुसवल्यामुळे दोन दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. या वेळी तत्काळ रुग्णवाहिका, स्थनिक नागरिकांनी घटनास्थळी पोहोचून खबरदारीचा उपाय म्हणून चालकाची चौकशी केली.
१० फुटांवर विद्युत रोहित्र..
अपघात झालेल्या ठिकाणच्या १० फूट अंतरावरच विद्युत वाहक रोहित्र आहे. जर टँकरचा धक्का रोहितत्राला बसला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. तसेच विद्युत रोहित्रा चा स्फोट होऊन मोठे नुकसान झाले असते.
दरम्यान, अपघात झालेल्या ठिकाणी नागरिकांनी अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली होती.