स्वस्त सोनं महागात पडलं ; सांगली जिल्ह्यातील व्यक्तीची पुण्यात तब्बल 10 लाखाची फसवणूक, 2 आरोपींना अटक

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात सांगली जिल्ह्यातील एका व्यक्तीची तब्बल 10 लाख 50 हजार रुपयाची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.त्या व्यक्तीला ३० हजार रुपये प्रति तोळा दराने सोनं देण्याच आमिष दाखवून तिची तब्बल १० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जयकुमार बाबासो नरदेकर असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.जयकुमार नरदेकर हे मिरज येथील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. तिथेच त्यांची ओळख आरोपी कृष्णा प्रकाश तुपे याच्याशी झाली. याच ओळखीचा फायदा घेऊन तुपेने नरदेकर यांना स्वस्तात सोनं मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. सुरुवातीला त्याने त्यांना १६ जुलै रोजी मध्य प्रदेशातील कटणी येथे नेलं. तिथे बुवा ठाकूर नावाच्या व्यक्तीने ३० हजार रुपये प्रति तोळा दराने सोनं विकत असल्याचं सांगितलं. विश्वास बसावा म्हणून त्यांनी नरदेकर यांना एक ग्रॅम सोन्याचा नमुना दिला. तपासणीमध्ये ते सोनं खरं असल्याचं समोर आल्याने नरदेकर यांचा विश्वास बसला.यानंतर तुपेने वारंवार फोन करून नरदेकर यांना सोनं घेण्यासाठी गळ घातली. अखेर २ ऑगस्ट रोजी नरदेकर यांनी १० लाख ५० हजार रुपयांचं सोनं घेण्याचा निर्णय घेतला. फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर त्यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी कृष्णा प्रकाश तुपे, राहुल चव्हाण, बुवा ठाकूर आणि एका अनोळखी साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ताब्यात घेतलेल्या तुपे आणि चव्हाणला न्यायालयाने शुक्रवार ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.