फोन १०० टक्के चार्ज करणं धोकादायक ठरू शकतं! जाणून घ्या मोबाईल चार्जिंगचे योग्य नियम..

पुणे : आजच्या काळात मोबाईलशिवाय जीवन अशक्य झाले आहे. कॉल्स, चॅटिंग, कामं, बँकिंग, GPS, फोटो आणि अगदी आरोग्याशी संबंधित अॅप्ससुद्धा या मोबाईलमध्येच असतात. त्यामुळे फोन सोबतच त्याची बॅटरी टिकवणं ही गरज बनली आहे.

मोबाईलची बॅटरी लवकर खराब होण्याची काही प्रमुख कारणे आहेत. लिथियम आयन बॅटरीला १०० टक्के चार्ज करणे योग्य नाही, कारण यामुळे बॅटरी फुगण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे, रात्रभर फोन चार्जिंगला लावल्याने ट्रिकल चार्जिंग सुरू राहते, जे बॅटरीच्या आरोग्यासाठी हानिकारक असते.


गरज नसताना वारंवार फास्ट चार्जिंगचा वापर केल्याने बॅटरी गरम होते आणि ती लवकर खराब होऊ शकते. उष्ण वातावरणात, जसे की उन्हात किंवा गरम ठिकाणी फोन चार्ज करणे टाळायला हवे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बनावट किंवा डुप्लिकेट चार्जरचा वापर करणे अत्यंत धोकादायक असू शकते, ज्यामुळे बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता वाढते.
मोबाईल बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी काही सोप्या टिप्स पाळणे आवश्यक आहे. फोनची चार्जिंग रेंज २० टक्के ते ८० टक्के ठेवणे बॅटरीसाठी सर्वोत्तम मानले जाते, कारण या रेंजमध्ये चार्जिंग सायकल अधिक काळ टिकते. अनेक मोबाईल कंपन्या आता ऑप्टिमाइज्ड चार्जिंग फीचर देतात, ज्याचा वापर केल्यास बॅटरी गरजेनुसार चार्ज होते.
फोनला उष्णतेपासून वाचवणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे गरम ठिकाणी तो ठेवू नये आणि चार्जिंग करताना मोबाईल कव्हरचा वापर टाळल्यास उष्णता बाहेर राहण्यास मदत होते. बॅटरी कमी असताना बॅटरी सेव्हिंग मोडचा वापर केल्यास चार्जिंग अधिक काळ टिकते.
गरज नसताना ब्लूटूथ, वाय-फाय आणि लोकेशनसारखी फीचर्स बंद ठेवल्यास बॅटरीचा अनावश्यक वापर टाळता येतो. डार्क मोड आणि ॲडाप्टिव्ह ब्राईटनेस चा वापर केल्याने स्क्रीनचा प्रकाश कमी होतो आणि बॅटरी वाचते.
बॅटरीची हेल्थ नियमितपणे तपासण्यासाठी मोबाईलच्या सेटिंगमध्ये दिलेली माहिती (उदा. iPhone मध्ये Battery Health) पाहावी. नवीन सॉफ्टवेअर अपडेट्स इन्स्टॉल करत राहणे महत्त्वाचे आहे, कारण त्यात बॅटरी व्यवस्थापनात सुधारणा केलेल्या असतात. जर बॅटरी लवकर संपत असेल, फोन जास्त गरम होत असेल किंवा चार्ज हळू होत असेल, तर शक्यतो सर्व्हिस सेंटरला भेट देणे सुरक्षित असते.
दरम्यान, १०० टक्के चार्जिंग ही एक चुकीची सवय आहे आणि फोन लवकर खराब होण्याचे हे एक मोठे कारण असू शकते. स्मार्टफोनचे आयुष्य वाढवण्यासाठी २० टक्के ते ८० टक्के चार्जिंगची पद्धत अवलंबणे आणि अनावश्यक चार्जिंग सवयी टाळणे फायदेशीर आहे.
