महापरिनिर्वाण दिनासाठी वाहतुकीत बदल, आज पिंपरीतील हे मार्ग राहणार बंद, पर्यायी रस्ते कोणते?, जाणून घ्या…

पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकाजवळ अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणार आहेत.

या जनसमुदायाच्या गर्दीमुळे आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने पिंपरी चौकातील वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांच्या आदेशानुसार शनिवारी (६ डिसेंबर) दुपारी १२ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत हे बदल लागू राहतील.

महावीर चौक, नाशिक फाटा, पिंपरी चौक आणि जवळील महत्त्वाच्या रस्त्यांवर गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी वाहतुकीचे मार्ग बदलले आहेत. चिंचवड येथील महावीर चौक ते पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यान सेवारस्त्याने येणाऱ्या वाहनांना तात्पुरती बंदी लागू केली आहे. याकरिता चालकांनी डी-मार्ट इन-ग्रेड सेपरेटरमार्गे पुढील प्रवास करावा, असा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.

याप्रमाणे कासारवाडीतील नाशिक फाटा चौकातून पिंपरीकडे जाणाऱ्या सेवारस्त्यावरील वाहनांसाठी देखील बदल करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहनांना डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर किंवा खराळवाडी येथील एच. पी. पेट्रोल पंपाजवळून उपलब्ध असलेल्या ग्रेड सेपरेटरचा वापर करून पुढील स्थळी जाता येणार आहे. हे सर्व बदल गर्दी टाळण्यासाठी आणि स्मारक परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी करण्यात आले आहेत.
दरम्यान, पिंपरी रेल्वे स्थानकाजवळील स्व. इंदिरा गांधी पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यानचा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गावरील वाहने मोरवाडी चौकातून पुढे जातील. याशिवाय नेहरूनगर चौकापासून पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंतचा मार्ग देखील बंद राहणार असून वाहनचालकांनी एच. ए. कॉर्नर बसथांबा ते मासूळकर कॉलनीमार्गे पुढे जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
देहूरोड आणि संपूर्ण पिंपरी परिसरातील या सर्व मार्गबदलांबद्दल वाहतूक विभागाने नागरिकांना आगाऊ सतर्क केले आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणाऱ्या गर्दीमुळे कोणतीही कोंडी निर्माण होऊ नये म्हणून हे बदल तात्पुरते लागू करण्यात आले असून सर्व वाहनचालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
