तिहेरी हत्याकांडानं चंद्रपूर हादरलं; नराधमानं पत्नीसह केली दोन मुलींची हत्या
चंद्रपूर : गाढ झोपेत असलेल्या दोन मुली आणि पत्नीला कु-हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मौशी गावात समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
अलका तलमले (वय ४०), तेजू तलमले, प्रणाली तलमले अशी मृतकांची नावे आहेत. याप्रकरणी आरोपी अंबादास तलमले (वय ५०) याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येणा-या मौशी गावातील आरोपी अंबादास तलमले हे आपल्या दोन मुली, एक मुलगा, पत्नी यांच्यासोबत वास्तव्य करीत होता. काही महिन्यांपासून घरात कौटुंबिक कलह सुरू असल्याने ही घटना घडल्याचे परिसरात बोलले जात आहे. शनिवारच्या रात्री मुलगा बाहेर गेला होता. दोन मुली, पत्नी गाढ झोपेत होत्या, तेव्हा अंबादास तलमले याने कु-हाडीने तिघांवर सपासप वार केले.
यात पत्नी अलका, मुलगी तेजू आणि प्रणाली या तिघींचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत आरोपीला अटक केली आहे. या तिहेरी हत्याकांडाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येचे कारण अद्याप पुढे आलेले नाही.
दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन हे घटनास्थळी पोहोचले. पुढील तपास नागभीड पोलिस करीत आहेत.