Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडूंनी घेतली चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ, उपमुख्यमंत्री पवन कल्याण…
Chandrababu Naidu : टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी आज आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. चंद्राबाबू नायडूंसोबत अनेक नेत्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
नायडू यांच्यासह जनसेवा पक्षाचे सर्वेसर्वा अभिनेता आणि राजकारणी पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेशही त्यात आहे.
विजयवाडा येथील केसरपल्ली आयटी पार्कमध्ये आयोजित केलेल्या शपथविधी सोहळ्यात आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह २५ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. Chandrababu Naidu
कोण कोण होते उपस्थित..
या शपथविधी सोहळ्याला देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार प्रफुल्ल पटेल या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती, तर साऊथ चित्रपट क्षेत्रातील प्रसिध्द अभिनेते रजनीकांत, चिरंजीवी यांच्यासह अनेक मान्यवरांनी देखील शपथविधी सोहळ्याला हजर राहून नायडू यांच्या सर्व मंत्रिमंडळाला शुभेच्छा दिल्या.
या नेत्यांना मिळाली नायडू मंत्रिमंडळात संधी…
चंद्राबाबू यांच्या मंत्रिमंडळात किंजरापू अचेन्नायडू, कोलू रवींद्र, नदेंडला मनोहर, पी. नारायण, वांगलापुडी अनिथा, सत्यकुमार यादव, आपका रामनायडू, एनएमडी फारूक, अनम रामनारायण रेड्डी, पय्यावुला केशव, अंजनी कोलू सत्यप्रसाद, गोपालु सत्यप्रसाद, कांडला दुर्गेश, गुम्माडी संध्याराणी, जनार्दन रेड्डी, टी. जी. भरत, एस. सविता, वासमशेट्टी सुभाष, कोंडापल्ली श्रीनिवास, मंडीपल्ली रामा प्रसाद रेड्डी आणि नारा लोकेश यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली. नारा लोकेश चंद्राबाबू नायडू यांचे चिरंजीव आहेत.