दररोज १० हजार आणि आठवड्याला ५० हजार जिंकण्याची संधी!! जाणून घ्या मध्य रेल्वेचा खास आणि जबरदस्त उपक्रम..

मुंबई : मध्य रेल्वेने मुंबई लोकल ट्रेनचा दैनंदिन प्रवास अधिक रोमांचक करण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. आता ‘लकी यात्री योजने’ अंतर्गत, दररोज एका भाग्यवान तिकीट धारकाला ₹१०,००० चे रोख बक्षीस आणि दर आठवड्याला ₹५०,००० चे बंपर बक्षीस जिंकण्याची संधी मिळेल.
ही योजना आठ आठवड्यांसाठी सुरू राहणार असून, दररोज एक भाग्यवान तिकीट धारक १०, ००० रुपये रोख बक्षीस जिंकू शकतो, तर आठवड्यातून एक प्रवासी ५०,००० रुपये जिंकण्याची संधी मिळवू शकतो.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे प्रवाशांना वैध तिकीट किंवा सीझन पास घेऊन प्रवास करण्यास प्रोत्साहन देणे. तसेच, विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी करण्यासाठी हा उपक्रम मोठी भूमिका बजावू शकतो.
मध्य रेल्वेवर दररोज सरासरी ४० लाख प्रवासी प्रवास करतात. अंदाजानुसार, यापैकी सुमारे २०% प्रवासी तिकिटाशिवाय प्रवास करतात. नियमित तपासणी मोहिमेदरम्यान दररोज सुमारे ४,००० ते ५,००० विनातिकीट प्रवासी पकडले जातात.
हा आकडा मोठा असल्याने, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकीट खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि नियमित तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना बक्षीस देण्यासाठी ही योजना आणली आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रवाशांकडून कोणत्याही अतिरिक्त नोंदणीची आवश्यकता नाही. रेल्वे तिकीट तपासनीस हे विजेत्यांची निवड करतील. तिकीट तपासणीदरम्यान, काही प्रवाशांना त्यांचे वैध तिकीट किंवा सीझन पास सादर करण्यास सांगितले जाईल. त्यानंतर, पडताळणी झाल्यावर त्या प्रवाशाला थेट रोख बक्षीस दिले जाईल. ही पारदर्शक निवड प्रक्रिया प्रवाशांमध्ये अधिक आकर्षण निर्माण करेल आणि त्यांना तिकीट घेण्यास प्रेरित करेल.
रेल्वेने प्रवाशांसाठी तिकीट खरेदी अधिक सुलभ करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन, मोबाईल तिकीट अॅप्स आणि ऑनलाइन बुकिंग सेवा यांचा समावेश आहे. त्यामुळे आता प्रवाशांना तिकीट खरेदी करणे अधिक सोयीस्कर झाले आहे.
दरम्यान, प्रवाशांना आकर्षक रोख बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल.विना तिकीट प्रवाशांची संख्या कमी होईल, त्यामुळे अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध रेल्वे सेवा मिळेल.नियमित प्रवाशांना तिकीट काढण्यास अधिक प्रेरणा मिळेल.रेल्वे तिकीट खरेदीसाठी अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाल्याने प्रवाशांना त्रास कमी होईल.