शेतकरी चिंतेत! राज्यातील ‘या’ भागात पुढील ४८ तासांत अवकाळी पावसाची शक्यता
पुणे : राज्यातील काही भागांत पुढील ४८ तासांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही भागांत अद्यापही उष्णतेची लाट आहे. परंतु काही भागांत पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत येत्या ३१ मेपर्यंत अवकाळी पाऊस बरसणार आहे. तर बहुतांश शहरात कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात मोठा दिलासा मिळू शकतो मात्र शेतक री कुठेतरी चिंतेत असणार आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत पाऊस अंदमान, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व्यापणार आहे. राजस्थान ते मध्य प्रदेशपर्यंत चक्रिय स्थिती तयार झाली आहे. दक्षिण भारतातील काही भागातही पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद याठिकाणी आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे