काळजी घ्या ! पुढील तीन दिवस पुण्यात पावसासह गारपीट होण्याची शक्यता…!
पुणे : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. हवामान विभागाकडून राज्यात तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असतानाच, पालघर , नाशिक आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तसेच गारपीट होण्याची शक्यता आहे.
सध्या 8 मार्च पर्यंत कोकण सोडून सर्वत्र पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसत आहे. त्यामुळे एकीकडे शेतमालाला भाव नसताना दुसरीकडे अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
नाशिकसह ग्रामीण भागात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने जिल्ह्यात काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता.
दरम्यान, हिमालयात सक्रिय झालेल्या पश्चिमी चक्रवाताचा परिणाम महाराष्ट्रात दिसण्यास सुरुवात झाली असून रविवारी अनेक भागांत पाऊस झाला. हिमालयात सलग दोन पश्चिमी चक्रवात तयार झाले असून त्या भागात जोरदार पाऊस व हिमवर्षाव सुरू झाल्याने उत्तर भारतातून हे गार वारे ताशी 55 कि.मी. वेगाने महाराष्ट्राकडे येत आहेत.