Chakan News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाकणमध्ये मोठी कारवाई, पोलिसांकडून ३६ लाख जप्त..
Chakan News : चाकण -शिक्रापूर रस्त्यावर विशाल गार्डनसमोर एका कारमध्ये असलेली सुमारे ३६ लाखांची रोकड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. आज सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
ही रक्कम महाळुंगे येथील एका व्यक्तीची असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. त्यांनी ही रक्कम कुठून आणली? आणि कोणाला द्यायची होती? याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर नेमके कारण पुढे येईल.
यासंदर्भात आयकर विभागाला माहिती देण्यात येणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाकण पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी केलेली आहे. त्यामुळे वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. जवळच दुय्यम निबंधक कार्यालय आहे. Chakan News
त्यामुळे जमिनीच्या खरेदी- विक्री व्यवहारासाठी रक्कम आणली होती का? असाही संशय व्यक्त केला जात आहे. परंतु रक्कम बाळगणाऱ्याने नेमके कारण सांगितलेले नाही. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड आणि त्यांच्या पथकाने केली.
दोन दिवसांपूर्वी साताऱ्यातील शेंद्रे येथे तब्बल १ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. पुणे-बंगळुरू महामार्गावर सातारा तालुका पोलिसांची ही मोठी कारवाई होती. कारमधून हे पैसे घेऊन जात होते. साताऱ्यामध्ये पोलिसांना एका कारमधून मोठी रक्कम घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती.
दरम्यान., या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारची तपासणी केली तेव्हा त्यांना कारमध्ये १ कोटी रुपये आढळून आली होती. हे पैसे नेमके कोणाचे आहेत याचा तपास सुरू आहे.