पुणे- मुंबईतील बेकायदा कॉल सेंटरवर सीबीआयची धाड ; तिघांना अटक

पुणे : केंद्रीय अन्वेषण विभागाने पुणे आणि मुंबईतून चालवल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यासह एका बँक अधिकाऱ्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक केलेल्या आरोपींना मुंबई विशेष न्यायालयाने ३० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आणि मुंबईतील कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती सीबीआयच्या मुंबई कार्यालयाला मिळाली होती.या कॉल सेंटरच्या माध्यमातून दरमहा तीन ते चार कोटींची फसवणूक केली जात होती. ही रक्कम बनावट बँक खाते, आभासी चलनातील गुंतवणूक आणि हवालामार्गे हस्तांतरित केली जात होती. बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाते उघडण्यात बँकांचे काही अधिकारीही सहभागी असल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. या कारवाईत 27 मोबाईल संच, 17 लॅपटॉप,आभासी चलन,रोकड असा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान फसवणूक करण्यासाठी आरोपींनी समाज माध्यमातील संपर्क यंत्रणेचा वापर केल्याचेही तपासात उघडकीस आल आहे. आभासी चलनात गुंतवणूक तसेच गिफ्ट कार्डच्या आमिषाने आरोपींनी फसवणूक केली आहे. आरोपींकडून दहा लाख वीस हजार तसेच 6 लाख 94 हजार रुपये मूल्य असलेले आभासी चलन,150 ग्रॅम अमली पदार्थ, लॅपटॉप मोबाईल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फसवणूक प्रकरणात मुंबई तसेच गुजरात मधील आरोपीविरुद्ध देखील गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणाचा सीबीआय मुंबई कार्यालयाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
