30 हजाराची लाच घेताना पकडलं, सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली तर नुसती नोटांची बंडलं…., नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : एका लायसन्स असलेल्या कोळसा वेंडरकडून 30 हजार रुपयांची लाच घेताना एका सरकारी अधिकाऱ्याला पकडलं. त्यानंतर त्याच्या घरावर धाड टाकली, तेव्हा मोठं घबाड हाती लागलं. सरकारी अधिकाऱ्यांच्या घरात कोट्यवधी रुपये सापडल्याची अशी अनेक प्रकरणं आहेत.

कटक सर्कल माइन्सचे डेप्युटी डायरेक्टर देबब्रत मोहंती यांना एका दिवसापूर्वी ट्रॅप ऑपरेशनमध्ये पकडलं होतं. त्यात ते लायसन्स असलेल्या कोळसा वेंडरकडून 30 हजार रुपयांची लाच घेत होते.
त्यानंतर ओदिशाच्या भुवनेश्वरमधील अँटी करप्शन एजन्सीने बुधवारी देबब्रत मोहंती यांच्या फ्लॅटवर छापा टाकला. तिथून 4 कोटी रुपये जप्त केले. ओदिशा विजिलन्सच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कॅश जप्तीची कारवाई आहे.

देबब्रत मोहंती यांच्या अटकेनंतर विजिलेंस अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. यात पाटियाच्या श्री विहार येथे नेचर्स क्रेस्ट अपार्टमेंटमध्ये त्यांचा रेजिडेंशियल फ्लॅट आहे. भद्रक जिल्ह्यातील मथासाही येथे वडिलोपार्जित घर आणि कटकमधल्या त्यांच्या ऑफिस चेम्बर येथे छापेमारीची कारवाई करण्यात आली.

छापेमारी दरम्यान अधिकाऱ्यांनी त्यांच्या भुवनेश्वरच्या फ्लॅटमधील ट्रॉली बॅग आणि कपाटात मोठ्या प्रमाणात असलेली रोख रक्कम, कॅश जप्त केली. एकूण किती रक्कम जप्त केली ते समजावं, यासाठी जप्त केलेल्या पैशांची मोजणी सुरु आहे. त्याशिवाय आरोपीच्या ऑफिसचं शेल्फ आणि त्याच्या खासगी सामानातून 1.20 लाख रुपये जप्त केले.