कोथरूड पोलिसांवर आरोप करणाऱ्या पुण्यातील’ त्या ‘तीन तरुणीवर गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यातील कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप मुलीनां केला होता. या आरोपावरून पोलिस आयुक्तालयात आंदोलन करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधित तीन मुलींसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील ‘मिसिंग’ प्रकरणात तीन मुलींना तपासासाठी कोथरूड पोलिस ठाण्यात आणले होते. त्या वेळी त्यांना मारहाण व शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला, या आरोपावरून त्या मुली व त्यांचे सहकारी आक्रमक झाले होते. त्यांनी तीन ऑगस्टला सकाळी १० पासून मध्यरात्री तीनपर्यंत पोलिस आयुक्तालयात आंदोलन केले. ५० ते ६० जणांनी ‘अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा’ अशी मागणी धरून ठेवली. मात्र, या प्रकरणातील तपासात कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत. घटनास्थळ इनडोअर असल्याचे नमूद करीत पोलिसांनी संबंधितांना पत्र दिले. आता याच प्रकरणात पोलिस आयुक्तालयात आंदोलन करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधित तीन मुलींसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी उपनिरीक्षक रेश्मा भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून, सागर आल्हाट, स्वप्नील वाघमारे, दत्ता शेंडगे, अॅड. परिक्रमा खोत, श्वेता पाटील, नितीन पाटील, ऋषीकेश भोलाने आणि अॅड. रेखा चौरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १९०, १८९ (२), २२१, २२३, ३२४ (३); तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७ (१), ३७(३) अंतर्गत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
