उरुळी कांचन येथील प्रियदर्शनी महिला पतसंस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल; दप्तर तपासणीत दिरंगाई…

उरुळी कांचन : लेखापरीक्षणाच्या वार्षीक तपासणीत कुठलाही लेखा जोखा सादर केला नसल्याने उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रियदर्शनी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, सचिव, सर्व संचालक व व्यवस्थापक यांच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र सहकारी सोसायटी अधिनियम 1960 अंतर्गत कलम 142 (ग) कायद्यान्वये हि कारवाई करण्यात आली आहे.

त्यानुसार पतसंस्थेच्या अध्यक्षा रंजना बाळासाहेब शिवरकर (रा. रेल्वे स्टेशनजवळ, तुपे वस्ती, उरुळी कांचन), हेमलता बाळासाहेब बडेकर (रा. बडेकर नगर, तुपे वस्ती, उरुळी कांचन), रंजना साहेबराव खेडेकर (सचिव, रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन), संचालिका जयश्री जयप्रकाश बेदरे (रा. आश्रम रोड, उरुळी कांचन), चंद्रलेखा जनार्दन मचाले (रा. डाळिंब- दत्तवाडी, ता. दौंड), शोभा पुंडलिक शिवरकर (रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन, सुनीता एकनाथ काळे (रा. शिंदवणे रोड, तळवाडी, उरुळी कांचन), ज्योती सुरेश धुकटे ( रा. उरुळी कांचन), निलम नरेंद्र काटे (रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन), निलोफर हमजू सय्यद, (रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन), सुरेखा राजेंद्र कांचन (रा. उरुळी कांचन), विजय भागचंद तलरेजा (व्यवस्थापक, रा. दातार कॉलनी, उरुळी कांचन, ता. हवेली) अशी अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी आर्थिक गैरव्यवहारामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या या पतसंस्थेच्या लेखापरीक्षणासाठी नियुक्त केलेल्या व अप्पर विशेष लेखापरीक्षक वर्ग (2), सहकारी संस्था, स्वारगेट, पुणे यांच्या अधीनस्त असलेल्या लेखा परीक्षक अस्मिता प्रकाश पंडित (वय-44, रा. थेरगाव, पुणे 33) यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक गैरव्यवहारामुळे गेल्या अनेक वर्षांपासून उरुळी कांचन येथील प्रियदर्शनी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था बंद पडली आहे. या सर्वांनी 21 जुलै 2025 ते 07 जानेवारी 2026 पर्यंत संस्थेचे दप्तर तपासणीसाठी वारंवार पत्रव्यवहार करीत मागूनही न दिल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक मीरा मटाले करीत आहेत.