सेवानिवृत्त मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल, भूसंपादनच्या उपजिल्हाधिकाऱ्यांसाठी १ लाख रुपयांची लाच प्रकरण, नेमकं घडलं काय?

पुणे : वडिलोपार्जित जमिनीच्या झालेल्या वाटप पत्राच्या नोंदीच्या केसचे निकाल पत्र देण्यासाठी पुणे भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी यांच्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सेवानिवृत्त मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून ही कारवाई केली आहे. सुनंदा अशोक वागसकर /येवले (वय 61 रा.सर्वे नंबर 37, केशव नगर, मुंढवा पुणे) यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका ४१ वर्षीय शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या माहिती नुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुनंदा वागसकर या सेवानिवृत्त मंडळ अधिकारी असून त्या सध्या पुणे भूसंपादन उपजिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी तत्त्वावर काम करत आहेत.

तर तक्रारदार हे एक शेतकरी असून त्यांच्या ६२ वर्षाच्या मामे बहीणीच्या वडिलोपार्जित जमिनीचे झालेल्या वाटप पत्राच्या नोंदीची केस पुणे भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्याकडे चालू आहे.

आरोपी लोकसेविका सुनंदा वागलकर या उपजिल्हाधिकारी भंडारे यांच्या कार्यालयात नोकरीस आहेत. केसची सुनावणी पूर्ण झाली असून त्या केसच्या निकालाची प्रत देण्यासाठी आरोपी लोकसेविका यागसकर/येवले व उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपयाची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, आरोपी लोकसेविका सुनंदा बागसकर यांनी तक्रारदाराकडे त्यांच्या मामे बहीणीच्या वडिलोपार्जित जमिनीचे झालेल्या वाटप पत्राचे नोंदीबाबत उपजिल्हाधिकारी भंडारे यांच्याकडील सुनावणी पूर्ण झालेल्या केसच्या निकालाची प्रत तक्रारदारांना देण्यासाठी स्वतःकरीता व उप जिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्याकरीता १ लाख रुपयांची लाच मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यानुसार, आरोपी सुनंदा अशोक यागसकर यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम 7, 7 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर पुढील तपास करत आहे.
