कर्नाटकात निवडणुकीसाठी भाजपनकडून १८९ उमेदवारांची यादी जाहीर ; ५२ नव्या चेह-यांना संधी…!

नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपकडून १८९ उमेदवारांची नावे जाहीर करत आहोत, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज बैठक घेतली. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि धर्मेंद्र प्रधान यांचाही समावेश होता. १८९ उमेदवारांत ५२ नवीन चेह-यांना संधी देण्यात आली. दरम्यान, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर बंडखोरीच्या तयारीत आहेत. याचा फटका भाजपला बसू शकतो.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शिगगावमधून निवडणूक लढवणार आहेत. याआधीही ते इथून जिंकून आले होते. कागवाडमधून बाळासाहेब पाटील निवडणूक लढवणार आहेत. गोविंद करजोळ मुदुलमधून, मुर्गेश निरानी हे बिलगीमधून निवडणूक लढवणार आहेत.
नव्या लोकांना संधी दिली जात असल्याचे भाजपने म्हटले आहे. ५२ नवीन उमेदवार आहेत. यातील ३२ उमेदवार ओबीसी, ३० एससी आणि १६ एसटीचे आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितले की, ९ डॉक्टर, ३१ पदव्युत्तर, ५ वकील, ३ शैक्षणिक, १ आयएएस, १ आयपीएस, ३ निवृत्त अधिकारी आणि ८ महिलांना तिकीट देण्यात आले आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते ईश्वरप्पांची निवृत्ती
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते ईश्वरप्पा यांनी कर्नाटकातील निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. ईश्वरप्पा यांनी मंगळवारी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला सांगितले की, त्यांना निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घ्यायचा आहे आणि त्यांना १० मेच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही जागेवरून उमेदवारी न देण्याचे आवाहन केले होते.