एसएमएस करुन घरी बोलावले, एकाच सोसायटीत राहणाऱ्या नराधमाचे धक्कादायक कृत्य, घटनेने पुण्यात खळबळ..

पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुण्यातील कस्तुरी चौकातील एका सोसायटीत राहणाऱ्या तरुणीवर तिच्याच सोसायटीत राहणाऱ्या नराधमाने जबरदस्तीने चुंबन घेतले आणि अतिरेक करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या वडिलांनी व भावाने शोध सुरू केला.
अखेर, ती आरोपीच्या घरात, वॉशिंग मशीनच्या शेजारी भयभीत अवस्थेत सापडली. त्यावेळी तिच्या शरीरावर ओरबाडल्याच्या खुणा असल्याचे दिसून आले. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पीडितेच्या वडिलांनी २४ वर्षीय आरोपी आणि त्याच्या कुटुंबाविरोधात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कुटुंबासोबत सोसायटीत राहते. ८ मार्च २०२५ रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास ती अचानक घरातून गायब झाली. तिचा शोध घेताना कुटुंबीयांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, ती सोसायटीच्या बाहेर जाताना दिसली नाही.
त्यामुळे ती सोसायटीतच कुठेतरी असल्याचा त्यांना संशय आला. कुटुंबीयांनी सोसायटीतील सर्व घरे शोधल्यावर आरोपीच्या घरात विचारणा केली. मात्र, आरोपीच्या कुटुंबाने मुलगी घरात नसल्याचे सांगितले.
संशय आल्याने वडिलांनी घरात जाऊन पाहिले असता, ती वॉशिंग मशीनच्या शेजारी भयभीत अवस्थेत सापडली. तिला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. चौकशीदरम्यान, पीडित तरुणीने सांगितले की, आरोपीने तिला मॅसेज करून घरी बोलावले. त्यानंतर जबरदस्तीने चुंबन घेतले आणि अतिरेक करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पीडिता भीतीपोटी कोणालाही काही सांगू शकली नाही. मात्र, कुटुंबीयांनी केलेल्या शोधमोहीमेमुळे हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.