Cabinet Meeting : मोठी बातमी! नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय…
Cabinet Meeting : राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करण्यात येतील. राज्यातील नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २०२१-२२ मध्ये झाल्या असून त्याचा कालावधी अडीच वर्षांचा आहे. तो आता संपत असल्यामुळे हा कालावधी पाच वर्षाचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येईल.
महाराष्ट्रात २२८ नगरपरिषदा व नगरपंचायती आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांच्या पाच वर्षांच्या कालावधीपैकी अडीच-अडीच वर्षांचे असे दोन अध्यक्ष निवडण्याचे निश्चित करून पहिल्या टप्प्याच्या नगराध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या आरक्षणाच्या सोडतीचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.
त्यामुळे, आता दुसऱ्या टर्ममधील नगराध्यक्षांची निवड काही दिवसांवर येऊन ठेपली असता नगराध्यक्षांचा कालावधी अडीच वर्षावरुन ५ वर्षांवर करण्यात आला आहे. त्यामुळे, नगराध्यक्षपदाची स्वप्ने पाहणाऱ्या नगरसेवकांची घोर निराशा झाली आहे.