मंत्रिमंडळ विस्तार पडणार लांबणीवर ; महत्त्वाचा खात्यांत मेळ बसत नसल्याने विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता ..

मुंबई : राज्य विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर, मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे, परंतु त्यावर दिल्लीत अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्यामुळे विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चर्चेनुसार, राज्य मंत्रिमंडळ विस्तार 11 किंवा 12 डिसेंबर रोजी होण्याची अपेक्षा होती, पण नवीन माहिती नुसार, 14 डिसेंबरला या विस्ताराचा शपथविधी होण्याची अधिक शक्यता आहे. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे, त्यामुळे त्यापूर्वी मंत्री शपथ घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केले होते.
महायुतीच्या तीन प्रमुख घटकांमधील चर्चेत मंत्रीपदासाठी संभाव्य नावं चर्चेला आली आहेत. भाजप, शिवसेना-शिंदे गट, आणि राष्ट्रवादी- अजित पवार गटाचे नेते मुंबईत संभाव्य मंत्र्यांची नावे सादर करून दिल्लीत अंतिम निर्णय घेणार आहेत. भाजपने शिवसेनेतील काही मंत्र्यांच्या नावांवर आक्षेप घेतले आहेत. यामुळे शिवसेनेत नाराजी व्यक्त होत आहे. आता मंत्रिमंडळ विस्ताराचे दिवस जवळ येत आहेत, परंतु इच्छुक मंत्र्यांना आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.